पालकमंत्र्यांसमोर खैरे -दानवेंनी पाळले ‘पॉलिटिकल डिस्टन्सिंग’

Foto
कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला असला तरी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांच्यातील पॉलिटिकल डिस्टंसिंग मात्र अबाधितच राहिले. नेते कार्यकर्ते आणि अधिकार्‍यांची अक्षरशः दाटीवाटी होत असताना या दोन्ही नेत्यांनी मात्र नियमांचे पालन करीत एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणेच पसंत केले.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये येईल मतभेदांची दरी स्पष्टपणे दिसून आली. तब्बल तासभर सोबत असलेल्या खैरे आणि आ. दानवे यांनी एकमेकांपासून अंतर राखल्याने या पॉलिटिकल डिस्टन्सिंग ची खमंग चर्चा होत आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकमंत्र्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले तेव्हा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे जातीने हजर होते. खैरे देसाईसोबत असल्याने आमदार दानवे यांनी अंतर राखणे पसंत केले. त्यानंतर देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले   त्यावेळीही खैरे पालकमंत्र्यांसोबत होते. दानवे यांनी आपल्या समर्थकांसह याही कार्यक्रमाच्या वेळी काही अंतर राखले. मात्र बैठक संपल्यानंतर कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्र्यांचे डीपीसी हॉलमध्ये आगमन झाल्यानंतर आमदार दानवे सभागृहात दाखल झाले. तेव्हा दोन्ही नेत्यांनी दूरदूर बसणे पसंत केले. 

दोन्ही नेते दहा मिनिटे सोबत !

दरम्यान उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर देसाई सभागृहातून बाहेर गाडीत बसण्यासाठी येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर खैरे -दानवे दोघेही पालकमंत्र्यांची वाट पाहात उभे होते. मात्र त्यांच्या अगोदरच खैरेंनी मोर्चा सांभाळला होता. दानवे त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले मात्र दोन्ही नेत्यांची तोंडे दोन दिशेला होती. तब्बल दहा मिनिटे हे दोन्ही नेते सोबत उभे असूनही एका शब्दाचाही संवाद दोघांमध्ये झाला नाही. पालकमंत्री आले पण काही न बोलताच थेट गाडीत जाऊन बसले.
खैरेंनी कव्हर केल्याची चर्चा !
शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी खैरे-दानवे या जोडीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. या वादाची माहिती योग्य पद्धतीने मातोश्री’वर पोहोचण्यात दोन्ही नेत्यांना नेत्यांनी कसर सोडली नाही. मात्र सध्या कोरोना संसर्गाची साथ असल्याने कोणतीही राजकीय घडामोड होणार नसल्याचे मातोश्री’वरून सांगण्यात आले. असे असले तरी देसाईं सोबत हितगुज करण्याची संधी मिळेल का ? या प्रतीक्षेत दोन्ही नेते असल्याचे दिसले. मात्र यात खैरेंनी अनुभवाचा फायदा घेत पालकमंत्र्यांचा संपूर्ण दौरा कव्हर केला. पालकमंत्री सकाळी विमानतळावर आल्यापासून ते पुन्हा विमानतळावर परतेपर्यंत खैरे सावलीसारखे हजर होते. त्यामुळे पालकमंत्र्यांना खैरेंनी कव्हर केल्याची चर्चा होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker